मएसो सिनियर कॉलेज आयोजित उद्यमी संवाद – कथा उद्योगाची, प्रवास उद्योजकांचा
सर्वसामान्य मराठी कुटुंबांमध्ये शिक्षण नोकरी आणि लग्न अशा सरधोपट मार्गाने जीवन जगले जाते. शिक्षण हे बहुतांश वेळा नोकरी मिळवण्यासाठीच घेतले जाते. उद्योग करण्यासाठी म्हणून शिक्षण फार कमी वेळा घेतले जाते, त्यामुळे आपल्याकडे नोकरदार निर्माण होतात. प्रत्येकामध्ये उद्योग करण्याची क्षमता असते परंतु आपण नोकरीच्या मागे धावत राहतो त्याऐवजी तरुणांनी स्वतःमधील उद्योजक शोधला पाहिजे, असे मत आद्या ज्वेलर्स स्टार्टअपच्या संचालक सायली मराठे यांनी व्यक्त केले.
मएसो सिनियर कॉलेजच्या आंत्रप्रेन्यूअर डेव्हलपमेंट सेल आणि डिक्की (DICCI) नेक्स्ट जेन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यमी संवाद – कथा उद्योगाची, प्रवास उद्योजकांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वेश देशपांडे यांनी सायली मराठे यांची मुलाखत घेतली, यावेळी सायली मराठे यांनी ज्वेलरी डिझाईनमध्ये असणाऱ्या संधी आणि त्या संदर्भात तरुणांनी कशाप्रकारे शिक्षण घेतले पाहिजे या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सायली मराठे म्हणाल्या, नोकरी आणि उद्योगांचे एकमेकांचे अनेक फायदे आणि तोटे असतात, परंतु नोकरी करताना ठराविक प्रमाणातच तुमची आर्थिक प्रगती होऊ शकते. उद्योग करताना अनेक अडचणी येऊ शकतात, परंतु आर्थिक प्रगती किती करायची हे पूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे सध्या तरुणांमध्ये उद्योग करण्याकडे भर दिसून येत आहे. उद्योजकांकडे सध्या ग्लॅमर म्हणून पाहिले जात असले तरी उद्योग करताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास तरुणांनी केला पाहिजे. केवळ स्टार्टअपचे फॅड म्हणून उद्योग सुरू करण्यापेक्षा आपली मानसिकता आणि गरज ओळखून तरुणांनी उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने तरुणांना उद्योगांमध्ये यश प्राप्त करता येईल.
कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर कोणत्या प्रकारचा व्यवसाय सुरू करावा, या संदर्भात अनेक तरुणांना योग्य माहिती नसते. त्यांना त्या प्रकारचे शिक्षणही मिळालेले नसते अशावेळी तरुणांनी प्रथम काही वर्ष आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये नोकरी करावी, त्यामधील अनेक तांत्रिक गोष्टी समजून घ्याव्यात आणि त्यांचा नंतर आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये उपयोग करून घ्यावा असा सल्लाही सायली मराठे यांनी यावेळी दिला.