मएसो सिनियर कॉलेजच्या आंत्रप्रेन्यूअर डेव्हलपमेंट सेल आणि डिक्की (DICCI) नेक्स्ट जेन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्यमी संवाद – ‘कथा उद्योगाची प्रवास उद्योजकाचा’ या विशेष मुलाखतपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चितळे बंधू मिठाईवालेचे व्यवस्थापकीय भागीदार इंद्रनील चितळे आणि सुपरब सेवा सॅनिटेकच्या संचालिका मैत्रेयी कांबळे या तरुण उद्योजकांनी आपल्या उद्योगाच्या यशस्वीतेचा प्रवास मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला. मएसो सीनियर कॉलेजचे प्राचार्य रवींद्र वैद्य, कार्यक्रम समन्वयक डाॅ. पूनम रावत, आंत्रप्रेन्यूअर डेव्हलपमेंट सेलच्या समन्वयक निलेश यादव व प्रतिभा पाटील यावेळी उपस्थित होते.
इंद्रनील चितळे म्हणाले, चितळे बंधू मिठाईवाले या उद्योगांमध्ये मी सक्रिय होण्यापूर्वी साठ वर्षे आमचा व्यवसाय कौटुंबिक व्यवसाय म्हणून सुरू होता. हा व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा अधिक प्रभावीपणे वापर केला. कोणताही व्यवसाय प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी सातत्य आणि विश्वास अत्यंत गरजेचे असते. आमच्या उत्पादनांवरील विश्वास असल्यामुळे आम्हाला हा व्यवसाय गेल्या ८० वर्षांपासून यशस्वीपणे सुरू ठेवता आला आहे.
कोणताही व्यवसाय एका रात्रीमध्ये यशस्वी होत नाही, त्यासाठी काळाबरोबर बदलणे गरजेचे आहे आणि काळाबरोबर आपण समाजाच्या गरजा आणि समस्या ही ओळखणे गरजेचे आहे असेही इंद्रनील चितळे यांनी यावेळी सांगितले.
मैत्रेयी कांबळे म्हणाल्या, मी सॅनिटायझेशन या व्यवसायामध्ये गेल्या तीन ते चार वर्षांपासून आहे एक स्टार्टअप बिजनेस वुमन म्हणून मला अत्यंत वेगळ्या प्रकारचे अनुभव या व्यवसायामध्ये आले. मला या व्यवसायामध्ये कोणताही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, त्यामुळे सर्व गोष्टी मला व्यवसायामध्ये प्रवेश केल्यानंतर शिकायला मिळाल्या.
सरकारी पातळीवर तरुण उद्योजक घडविण्यासाठी अनेक पॉलिसी आहेत. या पॉलिसी तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांना उद्योगांच्या दृष्टीने सक्रिय करणे आणि त्याप्रमाणे त्यांचा दृष्टिकोन घडविणे गरजेचे आहे, असेही मैत्रेयी कांबळे यांनी यावेळी सांगितले.