मयेसो सिनिअर कॉलेज पुणे च्या राष्ट्रीय सेवा योजना एकक वतीने यंदा प्रथमतःच गणेशोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. अनेकविध विषयांची मांडणी करून त्याद्वारे वैचारिक प्रबोधनास वातावरणनिर्मिती करणे या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झालेली असल्यामुळे व्याख्यानमालेचा मुख्य आशय शिवराज्याभिषेक ठरवण्यात आला. याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापन कौशल्ये व शिवराज्याभिषेक या दोन व्याख्यानांची प्रस्तुती निमंत्रित इतिहास जाणकारांकडून करण्यात आली. वक्त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन व श्रोत्यांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे व्याख्यानमालेचे आयोजन सफल झाले.

व्याख्यानमालेचे पहिले व्याख्यान शिवाजी महाराजांची व्यवस्थापन कौशल्ये या विषयावर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वक्ते श्री. सारंग भोईरकर व श्री. सारंग मांडके यांनी गोष्ट येथे संपत नाही या कथाकथनाद्वारे शिवाजी महाराजांचे युद्धनीती शास्त्र, संरचनात्मक मांडणी, आर्थिक नियोजन, गुणग्राहकता व दूरदृष्टी याबद्दल अतिशय विस्तृत माहिती दिली.
अनेक ऐतिहासिक प्रसंगांना या वेळेस उजाळा देण्यात आला तसेच अफजलखान वध या प्रसंगामधून शिवाजी महाराजांची व्यवस्थापन कौशल्ये किती अचूक व प्रभावी होती हे श्रोत्यांना ऐतिहासिक दाखल्यांमधून समजावून सांगितले.

व्याख्यानमालेचे दुसरे व्याख्यान सुधीर थोरात (कार्यवाह, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे) यांचे शिवराज्याभिषेक आणि त्याचे दूरगामी परिणाम या विषयावर झाले.
सुधीर थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही मराठा सरदार हे औरंगजेबाशी निकराने लढू शकले. त्यांनी औरंगजेबाशी लढा दिल्यामुळे इतर हिंदुस्थानामध्ये हिंदू साम्राज्य निर्माण होण्यास मदत झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्य निर्माण केले नाही तर हिंदूंना संरक्षण दिले त्यातून हिंदू संस्कृती कशाप्रकारे विकसित होऊ शकेल यासाठी ही प्रयत्न केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अत्यंत बारकाईने तरुणांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यांच्या केवळ युद्धनीतीचा नव्हे तर व्यवस्थापन कौशल्य, भाषाशास्त्र या विविध अंगांचा अभ्यास केल्यास तरुणांना आजच्या काळामध्ये हिंदू समाजासोबत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्यांना कशा प्रकारे तोंड देणे गरजेचे आहे याचे धडे घेता येतील, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा अभ्यास हा आजच्या प्रत्येक तरुणांनी करणे गरजेचे आहे, असेही सुधीर थोरात यांनी यावेळी सांगितले.

 

Scroll to Top
Skip to content